मुंबई: ठाकरे सरकारने मुंबई मेट्रोच्या आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात शाब्दिक लढाई सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयामुळे भविष्यात मोठा अनर्थ ओढावेल, अशी भीती व्यक्त केली. फडणवीस यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मेट्रो प्रकल्पासाठी जपानच्या जायका कंपनीने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. मात्र, अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत. परिणामी १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, अशी भीती देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
'आरेतील झाडे भाजपच्या कल्याणासाठी तोडली नाहीत'
काल शपथविधी पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयात येऊन पदभार स्वीकारला. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. ही स्थगिती फक्त कारशेडच्या कामाला आहे, मेट्रो प्रकल्पाचे इतर काम सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या कारशेडची आरे सोडून अन्यत्र उभारणी करणे जिकिरीचे काम असल्याने संपूर्ण मेट्रो प्रकल्पाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते.
अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील. #SaveMetroSaveMumbai— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 29, 2019
भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. आरेतील मेट्रो कारशेडच्या उभारणीला स्थगिती दिली तर आतापर्यंत झालेल्या ७० टक्के कामाला अर्थच उरणार नाही. या प्रकल्पाच्या कामाला जितका उशीर होईल, खर्चात तेवढी वाढ होईल. या सगळ्याचा भुर्दंड मुंबईकरांनाच सहन करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.