मुंबई : राज्यात ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये लेटरवॉर सुरु आहे. राज्यातील महिला सुरक्षा आणि कायदा-सुव्यस्थेबाबत प्रश्न उपस्थित करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी पत्र लिहिलं होतं. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत राज्यपालांना पत्र पाठवलं होतं. यावरुन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयात काही सल्लागार अपरिपक्व असल्यामुळे अशा प्रकारचं पत्र गेल्याचं माझ्या लक्षात येत आहे, अशा प्रकारचं पत्र पाठवताना मुख्यमंत्र्यांनीही खातरजमा करायला हवी, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कोणत्याही पक्षाचं शिष्टमंडळ जेव्हा राज्यपालांना भेटतं, तेव्हा राज्यपालांकडून एक पत्र राज्य सरकारकडे जातं, शिष्टमंडळ मला भेटलं, या त्यांच्या मागण्या आहेत, यानुसार आपण कारवाई करावी, असं या पत्रात असतं.
आताही जे पत्र गेलं आहे त्यामध्ये राज्यपालांनी सांगितलं, की तेरा आमदारांचं शिष्ठमंडळ मला भेटलं, त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. शक्ती कायदा लवकर लागू करण्याकरता दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी त्यांनी केली आहे, त्यामुळे आपण त्याचा विचार करावा, हे कोणतेही आदेश नाहीत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
सरकार कोणाचंही असो राज्यपालांकडून अशाच प्रकारचं पत्र फॉरवर्ड केलं जातं. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून अपरिपक्वता दाखवण्यात आली आहे, मुख्यमंत्र्यांकडून अशा प्रकारचं पत्र पाठवण्याऐवजी, राज्यातील पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले असते आणि शक्ती कायद्यावर लवकर निर्णय करण्याचा विचार झाला असता तर ते अधिक संवेदनशील दिसलं असतं, पण अशा प्रकारे त्याला राजकीय रंग देणं हे अयोग्य आहे अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.