#e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी

मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज 

Updated: Jun 27, 2020, 11:12 AM IST
 #e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी title=

मुंबई: कोरोनाचे संकट सरल्यानंतर मुंबई आणि पुणे या शहरांतील लोकसंख्या कमी decongest करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते शनिवारी 'झी २४ तास'च्या महाराष्ट्र एक पाऊल पुढे   #e_conclave मध्ये बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात महाराष्ट्राला व्यापाऱ्याच्या क्षेत्रात कोणत्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत, याचा सविस्तर उहापोह केला.

मात्र, यावेळी त्यांनी भविष्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील लोकसंख्या कमी करण्याची गरज व्यक्त केली. मला प्रांतीय आणि भाषिक राजकारण करायचे नाही. मात्र, मुंबई आणि पुण्याला डिकंजेस्ट decongest करण्याची गरज आहे. सध्या मुंबईत कोरोनाचं संकट किती गंभीर आहे, हे आपण पाहतच आहोत. त्यामुळे मुंबईबाहेर स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा प्रकल्पांच्या उभारणीला सुरुवात झाली पाहिजे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 
याशिवाय, भविष्यात समुद्र आणि नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी झाले पाहिजे. तरच पर्यटनासाठी बाहेरून लोक महाराष्ट्रात येतील. सध्याचा काळ हा कठीण आहे. मात्र, महाराष्ट्राकडे एक राज्य म्हणून खूप क्षमता आहे. त्यामुळे कोरोनानंतर महाराष्ट्र पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

त्यासाठी महाराष्ट्राने कन्व्हर्जन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ आणि कन्व्हर्जन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल निर्मितीवर भर दिला पाहिजे. भविष्यात राज्यातील वाहने ही LNG, CNG  आणि इथेनॉलमिश्रीत पेट्रोलवर चालवण्यात यावीत. यामुळे पर्यावरणाचे नुकसान कमी होण्याबरोबरच वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर कमी होईल. याशिवाय, शेती आणि इतर क्षेत्रात महाराष्ट्राने अभिनव उपाययोजना राबवल्या पाहिजेत. सिंधुदुर्गातील विमानतळाचा नियोजनपूर्वक उपयोग केल्यास कोकणाचा चेहरामोहरा पालटू शकतो, असे यावेळी नितीन गडकरी यांनी सांगितले.

'दिल्लीत आल्यावर मराठी संस्कृतीची खरी किंमत कळतेय'
मी महाराष्ट्रातील मराठी माणूस आहे. आता दिल्लीत असलो तरी माझा आत्मा महाराष्ट्रात आहे. आज राज्याबाहेर असल्यामुळे मला मराठी संस्कृती किती मोठी आहे, हे लक्षात येतेय. मुंबई आणि पुण्यात राहून मराठी संस्कृतीची खरी किंमत कळत नाही. कदाचित राज्याबाहेर आल्यावरच मराठी संस्कृतीचे मोठेपण समजते, असे उद्गार यावेळी नितीन गडकरी यांनी काढले.