मोठी बातमी । घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्याबाबत शासन अध्यादेश जारी

कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. आता तसे करता येणार नाही.

Updated: Jun 27, 2020, 10:04 AM IST
मोठी बातमी । घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्याबाबत शासन अध्यादेश जारी title=
संग्रहित छाया

मुंबई : कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक सोसायटीत घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येत होता. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. याची दखल घेत राज्य सरकारने  घरकाम करणाऱ्यांना सोसायटीत प्रवेश देण्यात यावा, कोणीही त्यांना प्रतिबंधित करु नये, असा अध्यादेश जारी केला आहे.

घर कामगार आणि वाहन चालक यांना सोसायटी आवारात प्रवेशबंदी नसल्याचे सहकार विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट  केले आहे.  शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या सूचना गृह निर्माण संस्थांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरकाम करणाऱ्यांना आणि वाहन चालकांना सोसाटीत प्रवेश करण्यापासून रोखता येणार नाही.

घरकाम करणाऱ्यांनासह काम करणाऱ्यांना प्रेवश नाकारणाऱ्या सोसायटी तसेच बिल्डींगवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला होता. आता तर सरकारने शासन अध्यादेश जारी केला आहे. तसेच कोरोना झालेल्यांना आणि त्यातून बरे होत असलेल्यांना वेगळे वागविल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच पुणे येथील अनेक सोसायटी कोरोना रुग्णांबाबत सरकारचे नियम डावलून आपले नियम आमलात आणण्यात येत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

ज्येष्ठ नागरिकांकडे अनेक घरकाम करणारे असतात. मात्र, सोसायटीचे पदाधिकारी काही नियमावली करुन त्यांना घरकाम करणाऱ्यांना प्रतिबंध करत होते. त्यामुळे ज्येष्ठांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच याबाबत तक्रारीही आल्या होत्या. त्यामुळे राज्य सरकारने घरकाम करणारे आणि वाहन चालक यांना सोसायटीत प्रवेश करताना रोखता येणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

शासनाचे परिपत्रक