डिसेंबर महिना मुंबईकरांसाठी दिलासादायक

आगामी नव्या वर्षाच्या स्वागताची मुंबईकर तयारी करत आहे. एकीकडे राज्यात आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८ रुग्ण सापडले असताना दुसरीकडे मुंबईकरांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरला.

Updated: Dec 18, 2021, 09:21 PM IST
डिसेंबर महिना मुंबईकरांसाठी दिलासादायक  title=

मुंबई : आगामी नव्या वर्षाच्या स्वागत करण्यासाठी मुंबईकर तयारी करत आहे. एकीकडे राज्यात आज दिवसभरात ओमायक्रॉनचे ८ रुग्ण सापडले असताना दुसरीकडे मुंबईकरांसाठी आजचा दिवस दिलासा देणारा ठरला.

गेले दोन वर्ष राज्यात आणि मुंबईत कोरोनाने धुमाकूळ घातला होता. मात्र, कोरोना विरोधात मुंबई महापालिकेने यशस्वी लढा दिल्यानंतर आता रुग्ण संख्या आटोक्यात येत आहे. तसेच मृृत्यू दर कमी करण्यातही पालिकेला यश आले आहे. १७ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत पहिल्यांदा रुग्ण संख्या शुन्यावर आली होती. त्यानंतर २०२१ च्या डिसेंबर महिन्यात ११, १५ आणि आज १८ डिसेंबरला कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद शून्य झाली आहे.

मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. मात्र, राज्यात आज ८ नवीन ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर  सातारा येथे ३ आणि पुणे मनपा क्षेत्रात १ रुग्ण सापडले आहेत. तर, शनिवारी दिवसभरात मुंबईत कोरोनाचे २८३ नवीन रुग्ण आढळले आहेत. 

कोरोनामुळे मृत्यूची एकही नोंद झाली नाही. त्यामुळे एकीकडे दिलासा मिळाला असला तरी ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे धोका काही कमी झालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नवीन कोरोना नियमाची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे नव्या वर्षांच्या स्वागताची तयारी करताना काळजी ही घ्यायलाच हवी.