मुंबई: गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत. दिलासादायक गोष्ट म्हणजे ओमायक्रॉनमुळे महाराष्ट्रात अद्याप एकही मृत्यूची नोंद झाली नाही. आज पुन्हा एकदा राज्यात ऑमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे 8 रुग्ण आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार 8 पैकी 4 रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर 3 रुग्ण सातारा इथे आणि एक रुग्ण पुणे मनपा क्षेत्रातील आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 48 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी मुंबईत 18, पिंपरी चिंचडवडमध्ये 10 पुणे ग्रामीणमध्य 6 आणि पुणे मनपा भागात 3 रुग्ण आढळले.
सातारा 3, कल्याण डोंबिवली 2, उस्मानाबाद 2, बुलढाणा 1, नागपूर, लातूर आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. 28 रुग्णांना त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले त्यापैकी एक रुग्ण मुंबईचा आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिका सतर्क झाली आहे. तर कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नवीन नियमावलीही जाहीर केली आहे.