Ranji Trophy Mumbai Win : अंजिक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर मात करत रणजी ट्ऱॉफीवर (Ranji Cup 2024) नाव कोरलंय. मुंबईचं (Mumbai) हे तब्बल 42 वं रणजी जेतेपद ठरलंय. अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भासमोर (Vidarbha) 538 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. पण विजयाचा पाठलाग करणारा विदर्भाचा संघ 368 धावांवर गारद झाला. मुंबईने तब्बल 169 धावांनी विजय मिळवला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरने (Akshay Wadkar) 102 धावांची झुंजार खेळी केली. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
विदर्भाची विजयसाठी झुंज
दुसऱ्या डावात मुंबई संघाकडून युवा मुशीर खानने 136 धावांची शतकी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यर 95 आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने 73 धावा करत चांगली साथ दिली. मुंबईने दुसऱ्या डावात 418 धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 538 धावांचं लक्ष विदर्भासमोर ठेवलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या अथर्व तावडे आणि ध्रुव शौरीने चांगली सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 64 धावांची भागिदारी केली. पण अथर्व 32 धावांवर तर ध्रुव 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेने झुंजार खेळी करत मुंबईची विजय लांबवला. क्षय वाडकरने झुंजार 102 तर हर्ष दुबेने (Harsh Dubey) 65 धावांची चिवट खेळी. पण या दोघांची झुंज संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही. लंचपर्यंत विदर्भचा संघ 5 विकेटवर 333 अशा भक्कम स्थितीत होता. पण लंचनंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आणि विदर्भाला 368 धावांवर गुंडाळलं.
मुंबईची भेदक गोलंदाजी
मुंबई तर्फे दुसऱ्या डावात तनुष कोटियन सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 39 षटकात 95 धावा देत 4 विकेट घेतल्या. तर मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि ऑलराऊंडर मुशीर खानने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानीला प्रत्येकी एक विकेट मिळाली. रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा थरार वानखेडे मैदानावर रंगला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या सामन्याला हजेरी लावली होती.
42 व्यांदा जेतेपदावर नाव
मुंबई इंडियन्सने तब्बल 42 व्यांदा रणजी ट्ऱ़ॉफी जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2015-16 नंतर मुंबईने मिळवलेला हा पहिला विजय आहे.