मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri bypoll election) कम्युनिस्ट पक्षानं शिवसेना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवाराला पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर कम्युनिस्ट नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ज्यांच्यात कधीकाळी विस्तवही जात नव्हता, असे दोन राजकीय पक्ष आता एकसाथ आले आहेत.
शिवसेना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (Shivsena-CPI) कधीकाळी एकमेकांच्या जीवावर उठलेले कट्टर प्रतिस्पर्धी... 52 वर्षांपूर्वी लालबाग परळमध्ये वर्चस्वासाठी एकमेकांना शिंगावर घेणारे पक्के हाडवैरी. ज्यांना कधीकाळी लाल माकडं म्हणून हिणवलं, तेच कम्युनिस्ट बुधवारी मातोश्रीवर पोहोचले, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं सन्मानानं आदरातिथ्य केलं. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या भगव्याच्या पाठीशी कम्युनिस्टांचा लाल बावटा खंबीरपणे उभा राहणार आहे.
शिवसेना आणि कम्युनिस्ट यांचा इतिहास लक्षात घेतला तर दोघांमध्ये कधी दिलजमाई होईल, असा दावा कुणीही केला नसता.
दरम्यान, हा सगळा इतिहास आता मागे पडलाय. बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपचा पाडाव करण्यासाठी शिवसेनेला पाठिंब्याची भूमिका घ्यावी लागल्याचं कम्युनिस्टांनी स्पष्ट केलं.
आता हाडवैर मिटलंय, भगव्या पाठीशी लाल बावटा उभा टाकलाय. उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारला कम्युनिस्ट आमदार विनोद निकोलेंनी पाठिंबा दिला होता. आता अंधेरीच्या रणमैदानात ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून कम्युनिस्ट लढणार आहेत. राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.