मुंबई : मुंबईतली सर्व कोविड सेंटर्स लवकरच सुरू होणार आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. पालिका आयुकांनी एका आठवड्याच्या कालावधीत ही सेंटर्स सुरू करण्याचे आदेश दिलेत. कोरोना केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यांपैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत; तर ९७५७ खाटा राखीव आहेत.
नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड काळजी केंद्रे बंद करण्यात आली होती; तर सात जम्बो कोविड केंद्रे आणि प्रत्येक विभागात एक असे एकूण २४ कोविड केंद्रे ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालीन वेळेत बदल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. त्यावर पोलीस खात्यात कार्यालयीन वेळत बदल करण्यात आलेत. पोलीस महासंचालकांनी यासंदर्भात आदेश दिलेत. गट अ आणि गट ब वर्गातील अधिकारी शंभर टक्के उपस्थित असतील, गट क आणि गट ड वर्गातील पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती 50 टक्के असणार आहे.
25 टक्के कर्मचारी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत कार्यालयात उपस्थित राहतील तर 25 टक्के कर्मचारी 11 ते 5 या कालावधीत कार्यालयात असतील. उर्वरित क आणि ड वर्गाचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम काम करतील. मात्र ज्यावेळी तातडीची आवश्यकता असल्यास अधिकारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकणार आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका तसंच खासगी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणारेय. खासगी रुग्णालयांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्यात. त्याचप्रमाणे लॅबमधील चाचण्यांची क्षमतादेखील वाढवण्यात येणारेय. एका बाजूला या उपाययोजना राबवण्यात येत असताना लसीकरण मात्र अतिशय संथपणे सुरू आहे.