मोठी बातमी: कांजूरमार्गमध्ये कोरोनाचा रुग्ण; पोलिसांकडून नेहरूनगर सील

हा व्यक्ती लालबाग येथील एका दुकानात कामाला होता. तो आणि त्याची पत्नी असे दोघेचजण घरात असतात.

Updated: Apr 2, 2020, 10:36 AM IST
मोठी बातमी: कांजूरमार्गमध्ये कोरोनाचा रुग्ण; पोलिसांकडून नेहरूनगर सील title=
प्रतिकात्मक फोटो

कृष्णात पाटील, झी मीडिया,  मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईच्या वरळी-कोळीवाडा, प्रभादेवी, दहिसर आण धारावी यासारख्या दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यानंतर आता मुंबई उपनगरातील कांजूरमार्ग येथेही कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. कांजूरमार्ग पूर्वेला असणाऱ्या नेहरूनगर येथील चाळीत हा व्यक्ती वास्तव्याला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती ५६ वर्षांचा असून त्याने कधीही परदेशात प्रवास केलेला नाही. हा व्यक्ती लालबाग येथील एका दुकानात कामाला होता. तो आणि त्याची पत्नी असे दोघेचजण घरात असतात. मात्र, कोणतीही पार्श्वभूमी नसताना या व्यक्तीला कोरोना कसा झाला, हा प्रश्न यंत्रणांना पडला आहे. कोणत्याही संपर्काशिवाय या व्यक्तीला कोरोना झाला असेल तर मुंबईत कोरोनाच्या समूह संसर्गाची सुरुवात झाली आहे, असे म्हणावे लागेल. असे झाल्यास मुंबईतील धोका अनेकपटीने वाढेल.

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे सरकार 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून नेहरूनगर परिसर बॅरिकेटस लावून सील करण्यात आला आहे. या परिसरात कंटेनमेंट झोनचे फलक लावण्यात आले आहेत. कालच धारावी परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडला होता. तर वरळी परिसरातही कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर वरळी-कोळीवाडा आणि आदर्शनगरमधील ८६ जणांना पोद्दार आयुर्वेदिक रूग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या संख्येत आणखी वाढ होऊन हा आकडा २०० पर्यंत जाऊ शकतो.

मुंबई आतापर्यंत एकूण १६२ रुग्ण आढळले आहेत.  येत्या काही दिवसांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.