दिलासादायक! क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले

पालिका कर्मचारी आणि पोलिसांकडून टाळ्या वाजवून स्वागत 

Updated: Apr 16, 2020, 11:28 AM IST
दिलासादायक! क्वारंटाईनमधून १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले title=

मुंबई : वरळी कोळीवाडा हा मुंबईतील कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट बनलाय. असं असताना आता वरली कोळीवाड्यातून दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या या १२९ जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. हे सगळे वरळीकर ठणठणीत होऊन सुखरूपपणे आपापल्या घरी पोहोचले आहेत.  

हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेले हे १२९ जण वरळी कोळीवाड्यात परतले. यावेळी पालिका कर्मचारी आणि पोलिसांकडून टाळ्या वाजवण्यात आल्या आणि त्यांच आनंदाने स्वागत करण्यात आले. हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या या लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. मात्र असे असले तरीही त्यांना १४ दिवसांचे क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगितले आहे. वरळीतील पोद्दार हॉस्पिटलमध्ये, तसंच विसावा हॉस्टेल आणि काही हॉटेलमध्ये हे १२९ जण क्वारंटाईन होते

. हे १२९ जण पॉझिटीव्ह पेशंट नव्हते मात्र ते कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आले होते. यानंतर या १२९ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यांच्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. या सर्व १२९ लोकांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आले आहेत. घरी परतल्यानंतरही १४ दिवस त्यांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आहेत.

 तसेच काही कोरोनाबाधित रूग्णही बरे होवून वरळी कोळीवाड्यात परतणार असल्याची माहिती मिळत आहे. वरळी कोळीवाड्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पोलिसांनी या संपूर्ण परिसरालाच सील केलं होतं. हा संपूर्ण परिसर हा 'कोव्हिड-१९' या साथीचा हॉटस्पॉट बनला आहे.