Corona Update : 'या' तारखेपर्यंत कोरोना संपणार, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तारीखच सांगितली

ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण पसरलं होतं, पण आता कोरोनाची लाट ओसरत चालली आहे, कोरोनाची दैनंदिन आकडेवारी दररोज कमी होत असल्याचा दावा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केला आहे. 

राजीव कासले | Updated: May 1, 2023, 03:04 PM IST
Corona Update : 'या' तारखेपर्यंत कोरोना संपणार, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी तारीखच सांगितली title=

Corona Update : कोरोना महामारीने (Coronavirus) गेली दोन वर्ष भारतासह जगभरात थैमान घातलं. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावे लागले. हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली. तर अनेक उद्योगधंदे बंद पडून कामगार देशोधडीला लागले. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाची लाट ओसरली. पण ओमायक्रॉनच्या नव्या विषाणूमुळे गेल्या काही दिवसात पुन्हा आकडेवारी वाढू लागली होती, त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता एक दिलासा देणारी बातमी आहे. 

आरोग्यमंत्र्यांनी केला दावा
कोरोनाची लाट ओसलत चालली असून येत्या 15 मेपर्यंत कोरोना संपुष्टात येईल असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केला आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णासंख्येही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. बाराशेवरुन हा आकडा साडेचारशेवर येऊन पोहोचला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट कमी तीव्रतेचा असल्याचंही सावंत यांनी सांगितलं. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी आपल्या भाषणात सावंत यांनी ही माहिती दिली आहे

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटली
राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत 15 टक्के घट झाली आहे. सध्या राज्यात 5 हजार 233 सक्रिय रुग्ण आहेत. एप्रिल महिन्यात हा आकडा सहा हजारावर गेला होता. पण गेल्या काही दिवसात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. 

आता नाकावाटे लस 
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी नाकावाटे घेण्यात येणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा मुंबईत 28 एप्रिलपासून प्रारंभ झालाय. इन्कोव्हॅक असं नाकावाटे देण्यात येणाऱ्या या लसीचं नाव असून 60 वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीचा डोस घेता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे, मुंबई महानगरातील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र या प्रमाणे 24 लसीकरण केंद्रांवर प्रतिबंधक लसीकरण सुरु करण्यात आलं आहे.  

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांची नावे आणि पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावर दररोज येत आहेत. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा  घ्यावी, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आलं आहे. पालिका कार्यक्षेत्रात 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. पात्र गटांचे आणि त्यानंतर  1 मे 2021 पासून 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आलं आहे.