अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय व्हायची शक्यता

राज्यातल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 2, 2020, 06:21 PM IST
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय व्हायची शक्यता title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि सगळे कुलगुरू यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत अंतिम वर्षाच्या परीक्षा पद्धतीबाबत निर्णय होऊ शकतो. 

ऑक्टोबर महिन्यात परीक्षा घेण्याबाबतच्या शासनाच्या आणि कुलगुरूंच्या भूमिकेवर राज्यपाल सकारात्मक आहेत. तसंच सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याच्या भूमिकेलाही राज्यपालांचा पाठींबा आहे, असं सांगितलं जात आहे. 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचेसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

परीक्षांबाबत ज्या बैठका सुरू आहेत, त्याबाबत राज्यपालांना माहिती दिली. विद्यार्थ्यांची मागणीही राज्यपालांपुढे मांडली. उद्या आणि परवामध्ये परीक्षांबाबत निर्णय घेऊ, असं उदय सामंत राज्यपालांना भेटल्यानंतर म्हणाले. 

आज कुलगुरूंची तीन टप्प्यांमध्ये बैठक आहे, तर उद्या राज्यपाल, कुलगुरू आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मिळून एक बैठक होईल. या बैठकीनंतर आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होईल, आणि त्यानंतर अहवाल सादर केला जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं.