'मुख्यमंत्री १५ तास काम करतात', बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

बदल्यांच्या आरोपांवरुन थोरातांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Updated: Sep 2, 2020, 05:49 PM IST
'मुख्यमंत्री १५ तास काम करतात', बाळासाहेब थोरातांकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : विदर्भातली पूरस्थिती अत्यंत गंभीर आहे, तसंच प्रशासन पूर्ण काळजी घेत आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार स्वत: फिरत आहेत, आयुक्त माझ्या संपर्कात, असल्याचंही थोरात म्हणाले आहेत.

आम्ही पुराच्या स्थितीमध्ये जाणं योग्य नसतं, प्रशासन काम करत असतं. मुख्यमंत्री रोज १५ तास तरी काम करतात. सर्व स्थितीवर त्यांचं लक्ष असतं, ते वेळोवेळी आढावा घेतात, सतत संपर्कात असतात, असं वक्तव्य थोरात यांनी केलं आहे. 

पुण्यामध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू दुर्दैवी आहे, आपण हॉस्पिटल उभं केलं आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत आहे, पण ही घटना घडायला नको होती, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बदल्यांच्या आरोपांनाही बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बदल्यांचे आरोप निरर्थक आहेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस यांना मागच्या ५ वर्षांची आठवण येत असेल, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. 

राज्यातलं ठाकरे सरकार फक्त बदल्या करण्यात व्यस्त आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बदल्या केल्या नसत्या तरी चाललं असतं, सगळे मंत्री आणि प्रशासन बदल्यांमध्ये गुंतलं आहे, असं फडणवीस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस आज आणि उद्या पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. इथल्या नुकासनग्रस्त भागाची पाहणी फडणवीस करणार आहेत.