मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आढळले आहेत. मुंबईत लॉकडाऊनला जवळपास 50 दिवसांहून अधिक काळ होऊनही कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचंच चित्र आहे. मात्र आता जून महिना कोरोनासाठीचा सर्वात पीक काळ असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना दिली आहे.
सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यापुढेही 15 ते 20 दिवसांमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आणखी वाढणार आहे. या वाढणाऱ्या आकड्यांविषयी माहिती देण्यात येईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत रुग्ण संख्या वाढेल, पुढे जून 15 तारखेपर्यंत, अगदी जून महिन्याच्या अखेरपर्यंतही रुग्णांची संख्या वाढणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढतच जाणार असून त्यानंतर कदाचिक रुग्णसंख्येत घट होऊ शकते, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी 'झी २४ तास'शी बोलताना दिली.
मुंबईत एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना दुसरीकडे मात्र कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला असल्याची दिलासादायक बाबही समोर येत आहे. 7 दिवसांनी दुप्पट होणारी कोरोना रुग्णांची संख्या आाता 13 दिवसांनी दुप्पट होत आहे.
सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतही कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढता आहे. शुक्रवारी धारावीत कोरोनाचे 84 रुग्ण वाढले असून, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1145वर गेली आहे. तर आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या 17 हजार 671 झाली असून आतापर्यंत 655 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.