मुंबई : कोरोनाविरुद्धचा लढा अधिक आक्रमकपणे लढण्यासाठी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मुंबईतल्या नामवंत डॉक्टर्सनी प्रतिसाद देत एक पाऊल पुढे टाकले आहे. डॉ. संजय ओक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध हॉस्पिटलमधल्या अनुभवी, तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स आता कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे सर्वाधिक मृत्यू दर असलेल्या महाराष्ट्राला यातून सावरण्यासाठी आश्वासक मदतीचा हात मिळाला आहे.
BreakingNews । राज्यातील कोरोनाविरुद्धच्या लढाईशी मुकाबला करण्यासाठी नामवंत डॉक्टरांचं स्पेशल टास्क फोर्स सज्ज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला तज्ज्ञ डॉक्टरांचा सकारात्मक प्रतिसाद#CoronaVirus @CMOMaharashtra #CoronaInMaharashtra @OfficeofUT #Maharashtra @ashish_jadhao pic.twitter.com/VP1e1PL8E5
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 14, 2020
दरम्यान, मुंबईत कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याची आणि त्यांचे विलगीकरण करण्याची मोहीम अधिक राबविण्यात येत आहे. याबाबत आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल दिले आहेत. या आदेशांच्या अंमलबजावणीचे अधिकार आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन व व्यवस्थापन हे विभागस्तरीय सहाय्यक आयुक्त आणि त्यांच्या संबंधित पथकाद्वारे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विलगीकरण करताना 'स्वतंत्र खोलीत एक व्यक्ती' अशी व्यवस्था संबंधित व्यक्तींच्या घरी सोय होत असल्यास तिथेच करावी, अन्यथा अन्यत्र संसर्गाचा प्रतिबंध होऊ शकेल अशा ठिकाणी करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.