बई : कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली अगदी तेव्हापासूनच भीतीची लाट सर्वत्र पाहायला मिळाली. ज्या झपाट्याने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ लागला ते पाहता विलगीकरण, आयसोलेशन, क्वारंटाईन, स्क्रीन टेस्ट असे अनेक शब्द दर दिवशी कानांवर पडू लागले. सुरुवातीला कुतूहलपूर्ण नजरेनं या शब्दांकडे पाहिलं गेलं. ज्या कुतूहलाची जागा लगेचच दहशतीनं घेतली.
क्वारंटाईन आणि आयसोलेशन या शब्दांनीच अनेकांना घाम फुटण्यास सुरुवात झाली. पण, या शब्दांचा खरा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? मुळात या शब्दांचा खरा अर्थ ठाऊक झाल्यास त्याविषयी असणारे गैरसमज दूर होऊन कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये येणारे अडथळे सहज दूर होऊन या व्हायरचा वाढता संसर्ग टाळणं शक्य होऊ शकतं.
आयसोलेशन म्हणजे काय?
ज्यावेळी एखाद्या रुग्णामध्ये अमुक एका आजाराची लक्षण सिद्ध होऊन आजार असल्याची बाब समोर येते तेव्हा त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं जातं. तेथे त्याला वेगळं ठेवण्यात येतं. यालाच आयसोलेशन म्हणतात.
क्वारंटाईन म्हणजे काय?
एखाद्या संशयास्पद भागातून कोणी व्यक्ती आला असेल. उदाहरणार्थ आता ज्याप्रमाणेसाथ पसरलेले सात देश जाहीर केले आहेत अशा एखाद्या ठिकाणहून एखादी निरोगी व्यक्ती आली. पण, त्याच्यामध्ये आजार आहे की नाही हे आपल्याला ठाऊक नाही. अशा व्यक्तीला वेगळं ठेवलं जातं, त्यालाच क्वारंटाईन असं म्हणतात.
आजारी व्यक्तींचं आयसोलेशन केलं जातं. तर, क्वारंटाईन हे निरोगी व्यक्तीचं केलं जातं. संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा धोका उदभवू नये यासाठीच हे दोन्ही मार्ग अवलंबले जातात. त्यासाठी घाबरण्याचं कोणतंच कारण नाही.
माहिती सौजन्य- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, आयएमए (महाराष्ट्र शाखा)