शिवजयंतीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या घरी असंख्य पत्र पाठवणार, नाना पटोले यांनी सांगितलं कारण

भाजप आणि शिवेसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता काँग्रेसनेही भाजपाला घेरण्याची तयारी सुरु केली आहे

Updated: Feb 17, 2022, 03:49 PM IST
शिवजयंतीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या घरी असंख्य पत्र पाठवणार, नाना पटोले यांनी सांगितलं कारण title=

मुंबई : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे देशात कोरोना पसरवला असं म्हटलं होतं. याविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर आंदोलनं केली. यावरुन बराच राडाही झाला.

आंदोलनानंतर काँग्रेसने आता आणखी एक निर्णय घेतला आहे. उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपर्यंत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पत्र पाठवली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी आज ही माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही असं सांगत नाना पटोले यांनी दिल्लीच्या सत्तासमोर गुडघे टेकून महाराष्ट्राचा अपमान करू नका, माफी मागा असे पत्र फडणवीसांना पाठवणार असल्याचं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असणारे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासोबत हस्तांदोलन करत असल्याचं दिसत आहे. यावर बोलताना नाना पटोले यांनी भाजपची प्रवृत्ती काय आहे याचं दर्शन काल झालं, ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कर्नल पुरोहित बाबत मी काय बोलणार नाही, पण यात कोणकोण आहे त्याचे दिशादर्शक करणारे ते चित्र होतं अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी लवकर सुरु व्हावी अशी मागणीही काँग्रेसने केली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाबाहेर आंदोलन करताना पोलिसांनी काँग्रेस नेते अतुल लोंढे यांचं दाबून धरलं होतं, याबाबत जो कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.