मोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन : बाळासाहेब थोरात.

काँग्रेस मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार

Updated: Jun 25, 2020, 02:58 PM IST
मोदी सरकारविरोधात काँग्रेस करणार आंदोलन : बाळासाहेब थोरात. title=

दीपक भातुसे, मुंबई : भारत-चीन वाद आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर यामुळे काँग्रेस मोदी सरकार विरोधात आंदोलन करणार आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारला जाब विचारणार आहे.'

या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी #SpeakupForOurMartyrs  ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर चालवली जाणार आहे.

इंधन दरवाधीविरोधात २९ जूनला आंदोलन

'आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच करावेत याच्या सुचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. याच दिवशी #SpeakuponPetroleumPrices  ही ऑनलाईन मोहिम सोशल मीडियावर चालवली जाणार आहे,' असे थोरात म्हणाले.

'त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करुन केला जाणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी विभागनिहाय समन्वयक नियुक्त करण्यात आले असून नागपूरसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, अमरावतीसाठी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, मुंबईसाठी आ. अमीन पटेल, कोकणसाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, उत्तर महाराष्ट्रासाठी आ. कुणाल पाटील, मराठवाड्यासाठी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर, पश्चिम महाराष्ट्रासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, फ्रंटल व सेल समन्वयक म्हणून गृहराज्य मंत्री सतेज पाटील तर सोशल मीडिया समन्वयक अभिजित सपकाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. देशासमोर कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चीनची आगळीक व पेट्रोल डिझेलची दरवाढ या दुहेरी समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्याविरोधात काँग्रेस पक्ष मैदानात उतरला आहे,' असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.