काँग्रेसनं केली संत-महंत सेलची स्थापना

काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कल्पनेतल्या संत महंत सेलची रविवारी घोषणा करण्यात आली आहे.

Updated: Jul 3, 2017, 08:53 PM IST
काँग्रेसनं केली संत-महंत सेलची स्थापना  title=

मुंबई : काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या कल्पनेतल्या संत महंत सेलची रविवारी घोषणा करण्यात आली आहे. सध्या समाजात बनलेली काँग्रेसची हिंदू विरोधी प्रतिमा या संत महंताच्या माध्यमातून बदलेल असा निरुपम यांना विश्वास आहे.

गेल्या काही दिवसात सातत्यानं घसरणारी लोकप्रियता आणि त्याचे निवडणुकांमध्ये दिसलेले परिणाम यामुळे आता संत महंतांच्या चरणी गेल्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याचं स्वतः निरुपम यांनी कबुल केलं आहे.

सध्या काँग्रेसच्या या मोहिमेत फारसे संत महंत सामील झालेले दिसत नाहीत. पण रविवारी या गटाच्या स्थापनेच्या दिवशी काँग्रेसनं राममंदिराला पाठिंबा द्यावा अशी मागणी महंतांनी करून टाकली.

आधीच पक्षांतर्गत कलहानं बरबटलेल्या मुंबई काँग्रेसला निरुपम यांचा हा नवा पवित्रा भावण्याची शक्यता कमीच होती. अपेक्षेप्रमाणे माजी मंत्री नसीम खान यांनी संत महंत सेल वैगरे स्थापन करणे ही काँग्रेसची परंपरा नसल्याचं म्हटलंय.  हा सेल कुणाच्या परवानगीनं बनवला याची माहिती घेणार असून हायकमांडशी याविषयी बातचित करणार असल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

निरुपम यांनी संतांच्या आध्यात्मातून मतांचा स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केलाय पण तो काँग्रेसला रुचणारा नाही, त्यामुळे निरुपम यांचाच काँग्रेसमधला जनधार आणखी खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.