'भाजपने हाजमोला मोफत वाटावं', काँग्रेसचा टोला

कोरोनाचा सामना करायला राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यात आंदोलन केलं.

Updated: May 23, 2020, 10:08 PM IST
'भाजपने हाजमोला मोफत वाटावं', काँग्रेसचा टोला title=

मुंबई : कोरोनाचा सामना करायला राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यात आंदोलन केलं. या आंदोलनात लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा भाजपने केला आहे, पण भाजपचं हे आंदोलन फसल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 

'या आंदोलनानंतर भाजपवर दोनदा प्रेसनोट काढण्याची नामुष्की ओढावली. आंदोलन यशस्वी झाल्याचं दाखवण्यासाठी भाजपचा संख्यावाढीचा वेग पाहता, १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचं दिसलं असतं. यापुढे भाजपने हाजमोला गोळ्या किंवा त्यांच्या पसंतीचं एखादं पाचक मोफत वाटावं', असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. 

'भाजपने संध्याकाळी ७.०९ वाजता काढलेल्या प्रेसनोटमध्ये राज्यभरातून अडीच लाख कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा केला गेला. यानंतर ८.५६ वाजता काढलेल्या दुसऱ्या प्रेसनोटमध्ये अडीच लाख कुटुंब आणि ८,७५,४८७ लोकं आंदोलनात सहभागी झाल्याचं सांगण्यात आलं. १ तास ४७ मिनिटात ६,२५,४८७ने हा आकडा वाढवलेला दाखवण्यात आला. मिनिटाचा हिशोब लावला तर एका मिनिटात ५८४५.६७२८९७१ एवढा होतो. याच वेगाने १५ दिवसात अख्खा महाराष्ट्रच आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा करता आला असता,' असा टोमणा सावंत यांनी मारला. 

'या आंदोलनाकडे लोकांनीच काय पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पाठ फिरवल्याचं राज्याने पाहिलं. भाजपचा हा दावा पोकळ आणि हास्यास्पद आहे. भाजपचं हे आंदोलन जनतेला रुचलेलं नाही, पण गर्वाचा फुगा फुटलेला असतानाही त्यांना वास्तवाचं भान राहिलेलं नाही. भाजपची कृती गिरे तो भी टांग उपर, अशीच आहे,' असं सचिन सावंत म्हणाले.