मुंबई: महाविकासआघाडीचे सरकार हे काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अस्तित्त्वात आले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून निर्णयप्रक्रियेत त्यांना डावलले जात असेल तर काँग्रेसने या सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे वक्तव्य 'रिपाई'चे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. परिणामी त्यांना पूर्ण गतीने काम करता येत नाही.
'महाविकासआघाडी'त नाराज काँग्रेस सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार, या मुद्द्यांवर चर्चा होणार
अशातच काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत डावलले जात आहे. काँग्रेसच्या ४२ आमदारांच्या पाठिंब्यामुळे हे सरकार अस्तित्त्वात आले. आता त्याचा मित्रपक्षाला डावलणे ही योग्य गोष्ट नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही नाराजी दूर केली पाहिजे. अन्यथा काँग्रेस पक्षाने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या नाराजीची दखल घेतली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी दूरध्वनीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. तर सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची नाराजी दूर होईल, असा अंदाज आहे.