कोण होणार विरोधकांचा विधीमंडळ पक्षनेता? काय असेल रणनीती?

काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं सत्तेत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय

Updated: Oct 30, 2019, 12:36 PM IST
कोण होणार विरोधकांचा विधीमंडळ पक्षनेता? काय असेल रणनीती? title=

मुंबई : भाजपापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीही आज विधीमंडळ पक्षनेता निवडीसाठी बैठका होत आहेत. राष्ट्रवादीला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्यामुळे राष्ट्रवादीचा नेता कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव चर्चेत आहे. तर मावळत्या विधानसभेत काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती. त्यामुळे विधीमंडळ पक्षनेतेपदी त्यांचीच निवड होते की आणखी दुसऱ्या कुणाला संधी मिळते? याकडे नजरा आहेत. 

दरम्यान, काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वानं सत्तेत सहभागी होणार नसल्याचं जाहीर केलंय. तरीही आघाडीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांकडून शिवसेनेला चिथावणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं शिवसेना विरोधकांच्या रणनितीला बळी पडते की काय? हे पाहावं लागणार आहे. सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्यावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये 'तू तू मै मै' सुरू आहे. महायुतीचा दुसऱ्यांदा संसार होणार की नाही अशी शंका असताना विरोधक मात्र शिवसेनेचा पारा कसा चढेल याची काळजी घेताना दिसत आहेत. शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात बसणार असं जाहीर केलंय. तरीही काँग्रेस राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतले नेते शिवसेना नेत्यांना चावी देण्याचं काम करत आहेत.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार नाही, असं आधीच सांगून टाकलंय. तर अशी काडी करण्यात तर नवाब मलिकांचा हात कोण धरणार? शिवसेनेनं पाठिंबा न दिल्यास सरकार कोसळलं तर राष्ट्रवादी पाठिंब्याचा विचार करेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिकांनी केलंय.

महायुतीच्या संसारात जेवढे बिब्बे टाकायचे तेवढे बिब्बे टाकण्याचं काम विरोधक करत आहेत. आता विरोधकांच्या चिथावणीला शिवसेना बळी पडते की काय, हे येत्या दिवसात स्पष्ट होईल.