राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच

राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे. 

Updated: Mar 6, 2018, 12:30 PM IST
राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यसभेसाठी येत्या २३ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी काँग्रेसमध्ये तीव्र रस्सीखेच सुरू आहे. 

दिग्गजांमध्ये रस्सीखेच

काँग्रेसमधील काही दिग्गज नेते उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यात काँग्रेसकडून एक जण राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. या एका जागेसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राजीव शुक्ल आणि पक्षाचे राज्यातील प्रवक्ते रत्नाकर महाजन या तीन नावांची शिफारस अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे करण्यात आली आहे. यातील सुशीलकुमार शिंदे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याशिवाय काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा हे थेट पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. 

काय आहे स्थिती?

राज्यसभेच्या राज्यातील सहा जागा रिक्त झाल्या असून संख्याबळानुसार भाजपाचे तीन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. शिवसेनेने विद्यमान खासदार अनिल देसाई यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार वंदना चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजपाच्या उमेदवारांची नावं येत्या दोन दिवसात निश्चित होणार आहेत.