डोकं ठिकाणावर आहे का? शिवसेनेची साथ देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा सवाल

मी पुन्हा हेच सांगू इच्छितो की...

Updated: Nov 1, 2019, 11:03 AM IST
डोकं ठिकाणावर आहे का? शिवसेनेची साथ देणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा सवाल title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच या निवडणुकांचे निकालही जाहीर करण्यात आले. या निकालांमध्ये समोर आलेली विजयी उमेदवारांची संख्या आणि त्यानंतर सत्तास्थापनेसाठीची गणितं, या साऱ्याच्या हालचाली सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरु आहेत. त्यातच शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादीकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो, असं वक्तव्य काही नेत्यांनी केल्यामुळे आता सत्तास्थापनेच्या चर्चांना चांगलाच वेग पकडला आहे. या सर्व वातावरणात काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेची साथ देण्याविषयीचं वक्तव्य करणाऱ्यांना, 'तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?', असा थेट सवाल केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच केलेल्या एका ट्विटचा संदर्भ देत निरुपम यांनी आणखी एक ट्विट केलं, ज्यामध्ये त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मी पुन्हा हेच सांगू इच्छितो की, काँग्रेसने शिवसेना- भाजपच्या या नाटकात हस्तक्षेप करु नये. सत्तास्थापनेत्या बाबतीत स्वत:चा वाटा मिळवत सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी हा त्यांचा क्षणिक वाद आहे. ते पुन्हा एकत्र येतील आणि आपल्याला निशाण्यावर घेतील', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 

शिवसेना- भाजप युतीमध्ये सत्तेच्या मुद्यावरुन सुरु असणारा सध्याचा वाद आणि त्यातच काही काँग्रेस नेत्यांकडून शिवसेनेला पाठींबा दिलं जाण्याचं वक्तव्य, दिल्लीत होणाऱ्या पक्षश्रेष्ठींच्या बैठका या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर निरुपम यांनी काँग्रेस नेत्यांपुढे थेट प्रश्न मांडला आहे. 'शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काही काँग्रेस नेते पुढे येतातच कसे?  त्यांचं डोकं तर ठिकाणावर आहे ना?', असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या संतप्त ट्विटवर आता काँग्रेसमधून नेमक्या काय आणि कशा प्रतिक्रिया येतात याकडे शिवसेनेचंही लक्ष असेल. 

दरम्यान, एकिकडे निरुप यांनी हे ट्विट केलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत भाजपला इशारा दिला. शुक्रवारी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत, भाजपने एकट्याने सत्तास्थापनेचं धाडस करु नये असा इशारा दिला.