मुंबई : भारतीय जनता पक्ष हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे. भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. हे देशातील जनता पहात आहे. वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सत्ता, पैसा आणि स्वायत्त संस्थाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या लोकशाही आणि संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. भाजपच्या या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत. राहुल गांधी हेच मोदी आणि भाजपाविरोधात ठामपणे उभे राहिले.
भूसंपादन कायद्यातील बदल आणि तीन काळ्या कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून राहुल गांधी मोदी सरकारविरोधात लढले. भाजपची विभाजनवादी निती, महागाई, बेरोजगारी, शेतकरीविरोधी धोरणे, सर्वसामान्यांचे प्रश्न यावर सातत्याने काँग्रेसनेच लढा दिला आहे.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन व्यक्तीगत महत्वाकांक्षेला बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व समविचारी राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. एका राज्यापुरता मर्यादीत राजकीय पक्ष भाजपला पर्याय ठरू शकत नाही. काँग्रेस हाच भाजपला सक्षम राजकीय पर्याय आहे असे नाना पटोले म्हणाले.
काँग्रसेला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची गरज नाही
लोकशाही आणि संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला. भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा आणि तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल. मागील 7 वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर 'फोडा आणि झोडा'चा प्रयोग करते आहे. देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे. देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही असं अशोक चव्हाम यांनी म्हटलं आहे.