फोन टॅपिंगचा दुरुपयोग करुन कर्नाटक आणि मध्य प्रदेशचं सरकार पाडले! काँग्रेसचा गंभीर आरोप

केंद्र सरकारने गैरवापर केला, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची नाना पटोले यांची मागणी

Updated: Jul 21, 2021, 06:08 PM IST
फोन टॅपिंगचा दुरुपयोग करुन कर्नाटक आणि मध्य प्रदेशचं सरकार पाडले! काँग्रेसचा गंभीर आरोप title=

मुंबई : संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यानंतर पेगाससच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पेगॅसस’(Pegasus Snoopgate) यंत्रणेच्या डेटाबेसमधील काही माहिती फुटली असून, त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे फोनक्रमांक आढळले आहेत. त्यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केला आहे. 

फोन टॅपिंगचा दुरपयोग

फोन टॅपिंगचा दुरपयोग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले गेलं, केंद्र सरकारने याचा गैरवापर केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. अनेकांचे फोन टॅप केले. ही गंभीर बाब आहे. संवैधानिक व्यवस्थेविरोधातील हे कृत्य असून गोपनीयतेचा भंग केला आहे. त्यामुळे संबंधितांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली.

राजभवनाबाहेर उद्या धरणं आंदोलन

पॅगेसेस प्रकरणी आम्ही उद्या राजभवनाबाहेर धरणे धरणार आहोत, तसंच राज्यपालांना निवेदन देणार असून या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी राज्यपालांकडे करणार आहोत अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. विधानसभेतही फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता, त्यावेळी सरकारने कमिटी बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, ही कमिटी लवकर स्थापन करण्यात यावी, याप्रकरणाची माहिती समोर यायला हवी असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

स्थानिक निवडणुका स्वबळावर

महाराष्ट्रात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे ठरलं आहे, त्याची तयारी आम्ही सुरु केली आहे, पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं, त्यासाठी सगळे नेते तयार आहेत, असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

मोदी सरकार जबाबदार

देशातील लोकांना लस मिळत नाही, आपलं शत्रू राष्ट्र पाकिस्तानला लस मोफत दिली जाते, त्यामुळेच लॉकडाऊनला सामोरं जावं लागलं असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडत आहे, लोक देशोधडीला लागले आहेत, या सगळ्याला मोदी सरकार जबाबदार आहे असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

केंद्राने ऑक्सिजन संदर्भात राजकारण करू नये

राज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही असं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने कोर्टात सादर केलं, त्यात तथ्य आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही. नाशिकमध्ये जी घटना झाली तो अपघात होता. तिथे भाजपची सत्ता महापालिकेत आहे. ऑक्सिजन यंत्रणा उभारण्यात तिथे भ्रष्टाचार झाला. आपल्या शेजारी भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, गोव्यात ऑक्सिजन अभावी लोकं मेली. या सगळ्या पापाचे भागीदार भाजप आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.