मुंबई : एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दाव केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात भीम आर्मी आणि रिपब्लिकन संघटनेने उडी घेतली आहे. भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन संघटनेने समीर वानखेडे यांच्याविरोधात जात पडताळणी समितीकडे (District Caste Scrutiny Committee) तक्रार दाखल केली आहे.
समीर वानखेडे यांनी जातीचा खोटा दाखला देऊन नोकरी बळकावल्याच आरोप या दोन्ही संघटनांनी केला आहे. नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडे यांनी बोगस कागदपत्र सादर केल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचा खोटा आणि चुकीचा दाखला मिळवून त्या आधारावर यु.पी.एस.सीमध्ये अनुसूचित जाती कोट्यात आय.आर.एस, कस्टम आणि सेंट्रल एक्साईज विभागात खोटी माहिती व पुरावे सादर करुन नोकरी मिळवली आहे, असं या तक्रारीत नमुद करण्यात आलं आहे.
नवाब मलिक यांनी जात प्रमाणपत्रावरुन आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांनी दिल्लीत धाव घेत राष्ट्रीय मागासवर्ग अध्यक्षांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आयोगाच्या अध्यक्षांना सर्व कागदपत्रे सादर केली होती. आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे.
समीर वानखेडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपण दलित असून माझा मुलगाही दलित असल्याचं म्हटलं होतं. मुस्लिम धर्माशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. पण समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांनी आपल्या मुलीचा मुस्लिम कुटुंबातच लग्न झाल्याचा दावा केला आहे.