मुंबई : देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही... असं वक्तव्य करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. उद्यापासून दोन दिवसीय हिवाळा अधिवेशन सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते देखील उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.
सध्या देशात शेतकरी आंदोलनावरून राजकारण तापलं आहे. दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनावरूनही ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशातील अन्नदात्याला देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं आपल्या संस्कृतीत बसत नाही. असं ते म्हणाले.
शिवाय शेतकऱ्यांच्या हक्कांबद्दल कोणी आवाज उठवला तर ते देशद्रोही. विरोधात बोललं आणि तुरुंगात टाकणं ही आणीबाणी नाही का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.
तुम्हीच कांदा पाकिस्तानातून आयात करता आणि आता शेतकरी देखील पाकिस्तानातून आणता का? असा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.