दीपक भातुसे झी मीडिया, मुंबई : सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणी विरोधी पक्षाने राज्य सरकार आणि मुंबई पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय.
विरोधी पक्ष इंटरपोल किंवा नमस्ते ट्रम्प यांच्या अनुयायांना या प्रकरणी चौकशीसाठी आणू शकतात. देवेंद्र फडणवीस यांना हे समजलं पाहिजे की, गेली पाच वर्षे त्यांनी याच पोलिसांबरोबर काम केलं आहे. कोरोनाबरोबरच्या लढाईदरम्यान याच पोलिसांचा बळी गेला आहे. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचा मी निषेध करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुंबई पोलीस अकार्यक्षम नाहीत. कोणाकडे या प्रकरणाबद्दल काही पुरावे असल्यास त्यांनी ते आमच्याकडे आणून द्यावेत. आम्ही चौकशी करून दोषींना शिक्षा देऊ. तथापि, कृपया महाराष्ट्र आणि बिहार या दोन राज्यांमधील भांडणे निर्माण करण्यासाठी या प्रकरणाचे निमित्त म्हणून वापरू नका. जो कोणी या प्रकरणात राजकारण आणत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी भावना सामान्यांमध्ये आहे, पण राज्य सरकार त्यासाठी तयार नसल्याचं फडणवीस म्हणाले होते. तसंच याप्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय असल्यामुळे ईडीने कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती. यानंतर काही तासांमध्येच ईडीने याप्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोवितवर गुन्हा दाखल केला.