अमित जोशी, मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सण देखील साधेपणाने साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आहे. याबाबत परीपत्रकही काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणाने साजरे करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव देखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. नागरिकांनी सामाजिक भान राखत शांततेने गणेशोत्सव साजरा केला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच आवाहन त्यांनी नवरात्री आणि दसरा सणादरम्यान ही केले आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग अजूनही झपाट्याने वाढत आहे. आज देखील राज्यात २१,०२९ रुग्ण वाढले आहेत. तर ४७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे. राज्यात आतापर्यंत ९,५६,०३० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून अजूनही राज्यात २,७३,४७७ रुग्ण उपचार घेत आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ७५.६५ टक्के इतका झाला आहे. तर मृत्यूदर २.६८ टक्के इतका आहे.