मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची आज संध्याकाळी बैठक होत आहे. उद्या मंत्रिमंडळ विस्तार करायचा की नाही यावर दोघांमध्ये चर्चा होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची विस्ताराची तयारी झाली असून दोघेही पक्ष काँग्रेसच्या यादीच्या प्रतिक्षेत आहेत. काँगेसची यादी आज अंतिम झाली नाही तर विस्तार करायचा की नाही याव चर्चा होणार आहे. त्यामुळे उद्याचा शपथविधी लांबण्याची शक्यता देखील आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारनंतर विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यामध्ये शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार. यात १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ही १३ मंत्री शपथ घेणार असून यातही १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री असणार आहेत. काँग्रेसचेही १० मंत्री शपथ घेणार असून यात ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्र्यांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आता पुढचं पाऊल टाकणार आहे. मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचा शपथविधी गेल्या २८ नोव्हेंबरला पार पडला होता. नागपूर अधिवेशनात या ७ मंत्र्यांनीच राज्यकारभार चालवला होता. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न मार्गी लावायचे आहेत. प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी विभागावर मंत्री असणं गरजेचं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. सध्या ७ मंत्र्यांमध्येच खातेवाटप करण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीच्या या मंत्रिमंडळात कोणा-कोणाची वर्णी लागणार याबाबत ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सूकता आहे.