मुंबई: राज्यात मुख्यमंत्री दलाची वेळ येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मराठी माणसाचे हित हे एकजूट राखण्यातच आहे. त्यामुळे सर्व जातीच्या लोकांना येऊन हा प्रश्न सोडवाला पाहिजे, असे जोशी यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचे नेतृत्व काढून घेतले जाईल अशी भाजपच्या गोटातच चर्चा आहे, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.
मात्र, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मात्र संजय राऊत यांचा दावा फेटाळला. राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. सरकार स्थिर आहे. पक्षातही कोणतीच नाराजी नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बदलणार ही शिवसेनेने पसरवलेली अफवा आहे, असल्याचे भंडारी यांनी सांगितले होते.