महाराष्ट्राला 'खिचडी' सरकार नाही तर स्थिर सरकारची गरज - मुख्यमंत्री

महाराष्ट्राला आम्ही स्थिर सरकार देऊ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Updated: Nov 23, 2019, 10:00 AM IST
महाराष्ट्राला 'खिचडी' सरकार नाही तर स्थिर सरकारची गरज - मुख्यमंत्री title=
संग्रहित फोटो

मुंबई : महाराष्ट्रात जवळपास महिनाभर सुरु असलेल्या नाट्यानंतर मोठा राजकीय भूकंप झाला. शनिवारी सकाळी ८ वाजता भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले आहेत. 

जनतेने भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट जनादेश दिला होता. पण शिवसेनेने जनादेश नाकारत दुसरीकडे युती करण्याचा प्रयत्न केला. कोणताही पक्ष सरकार स्थापन करु न शकल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रासारख्या अग्रेसर राज्याला अनुकूल नाही. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज होती. तीन पक्षांच्या खिचडी युतीमुळे सरकार चालू शकत नसल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवार यांचे फडणवीसांनी आभार मानले आहेत. महाराष्ट्राला आम्ही स्थिर सरकार देऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

अजित पवार यांनी, चर्चेला कंटाळून भाजपाला पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि इतर समस्यांचा सामना करण्यासाठी आम्ही एक स्थिर सरकार देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले.