मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा जोरावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी अमित शाह आणि नितीन गडकरी यांची भेटही घेणार आहेत. पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला तर रविवारी राज्य अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. रविवारी शपथविधीनंतर नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकतात.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्ताराचा १४ जून म्हणजेच आजचा मुहूर्त टळणार हे गुरुवारी सकाळीच स्पष्ट झालं होतं. 'झी २४ तास'ला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळ विस्तार तूर्तास बारगळला गेला. राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होती. काँग्रेसमधून भाजपात येत असलेले विखे पाटील, अब्दुल सत्तार हे मंत्रिमंडळ विस्तारात पद मिळण्याबाबत आशावादी होते. मात्र आता तूर्तास मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही हे स्पष्ट झालंय.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी मात्र दोन तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार शक्य असल्याचं म्हटलंय. तर पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्यास तयारी असल्याचं सूचक विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत केलंय. प्रदेशाध्यक्ष पदाची माळ चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात पडणार अशी जोरदार चर्चा आहे. त्यामुळे त्यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं समजलं जातंय. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेतकरी सन्मान भवनाचं भूमीपूजन करण्यात आलं. राज्यातील हे पाहिलंच भवन असणार आहे.