गणेश कवाडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईच्या कांदिवली परिसरात एका शाळेतील थरकाप उडवणारी घटना घडली आहे. इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी शाळेत चाकू घेवून गेला. या चाकूने त्याने त्याच्या एका ओळखीच्या विद्यार्थ्यावर सपासप वार केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे(Crime News). कांदिवलीत अल्पवयीन मुलाने चाकू हल्ला केल्याच्या धक्कादायक घटनेमुळे पोलिस देखील चक्रावले आहेत. एका खासगी शाळेबाहेर घडलेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पूर्व वैमनस्यातून एका 15 वर्षीय विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केरण्यात आले आहे. या जखमी मुलाला उपचारादरम्यान 19 टाके पडले आहेत.
ही घटना 26 नोव्हेंबरची आहे. पण, आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटना समोर आली. आरोपी विद्यार्थी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. शाळेबाहेरच हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेच्या व्हिडिओची दखल घेऊन, कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 326 (स्वैच्छिकपणे धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. कांदिवली पोलीस आरोपी मुलाचा शोध घेत आहेत.