सिडको घेराव आंदोलन, 20 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

Updated: Jun 25, 2021, 09:01 PM IST
सिडको घेराव आंदोलन, 20 हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल   title=

स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने गुरुवारी 'सिडको घेराव आंदोलन' करण्यात आलं होतं. याप्रकरणी आजी-माजी आमदार, खासदार तसंच आंदोलनात सहभागी झालेले सुमारे 18 ते 20 हजार आंदोलनकर्त्यांवर विविध कलमांखाली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. 

विविध कलमांखाली गुन्हे दाखल

आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नसताना, तसंच मनाई आदेश लागू असताना प्रकल्पग्रस्तांनी घेराव आंदोलन करुन सुमारे 20 हजारांची गर्दी जमवली,  आंदोलनकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी करुन कोरोना नियमांचे उल्लंघन केलं, अशा विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांची आहे तर शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी नवी मुंबईतील भूमिपूत्रांकडून गुरुवारी नवी मुंबईतील सिडकोवर आंदोलन करण्यात आलं. येत्या 15 ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

सिडको अधिकाऱ्यांना निवेदन  

विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडकोला घेराव घातला. या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली अशी विविध ठिकाणहून आंदोलक सहभागी झाले. यावेळी सिडको अधिकाऱ्यांना आंदोलकांकडून एक निवेदन देण्यात आलं.