'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...

Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, 'मी माणूस आहे.... मला काय'  

सायली पाटील | Updated: Jul 2, 2024, 11:31 AM IST
'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले... title=
Ambadas Danve replies prasad lad demanding his resignation vidhan parishand latest news

Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाचा सुरुवातीपासूनचा प्रत्येक दिवस असंख्य कारणांनी चर्चेत राहिला. आरोप प्रत्यारोपांच्या या सत्राला सोमवारी काहीसं गंभीर वळण मिळालं. जिथं सभागृहातील शिवराळ भाषेच्या वापरावरून आता अंबादास दानवे विरुद्ध भाजप नेते प्रसाद लाड यांच्यात संघर्षाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळत आहे. 

सभागृहात शिवीगाळ केल्याप्रकरणी दानवेंचं निलंबन करा, दानवेंनी माफी मागावी अशी मागणी लाड यांनी केली. या आंदोलनादरम्यान त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. ज्यानंतर विधानभवनात जाण्याआधी दानवेंनी माध्यमांशी संवाद साधताना, 'आंदोलन करून काही होणार नाही. राजीनाम्याची मागणी सभापतींकडे जाऊन करावी. आता भाजपला कायदे आणि नियम आठवू लागलेयत. याआधी त्यांना कायदा म्हणजे घरची जहागिरी वाटत होती' अशा शब्दांत पलटवार केला. 

अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यामुळं झोप लागली नाही, असं म्हणणाऱ्या प्रसाद लाड यांना ते राजकारणात नवे असल्याचा टोला खुद्द दानवेंनी लगावला. ज्या पद्धतीचं वक्तव्य सभागृहात करण्यात आलं, त्यासंदर्भातही दानवेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. 'मला काय... मी माणूस आहे. समोरच्याचं सहन करायचं थोडी. मी काल इथं बोललो आहे, ज्यानं कोणी बोट दाखवलं... मी काही पळपुटा नाही त्यांच्यासारखा, मी बोललो तर मी बोललो. आता जे झालं ते झालं...', असं दानवे म्हणाले.

हेसुद्धा वाचा : हातवारे, शिवीगाळ अन्... दानवेंच्या वक्तव्यावरून खडाजंगी; राजीनाम्याची मागणीसह विरोधकांनी अडवली विधानपरिषदेची वाट

प्रसाद लाड यांच्यासारखे लोक हिंदुत्वं शिकवतात जे जिथं सत्ता आहे तिथं धंदापाण्यासाठी, स्वत:च्या व्यवसायासाठी जातात. हे लोक काय हिंदुत्वं शिकवणार, यांना काय माहित हिंदुत्वासाठी काय करावं लागतं... या शब्दांत दानवेंनी नकारात्मक सूर आळवला. लाड यांनी सभापतींशी बोलणं अपेक्षित होतं, माझ्याकडे हातवारे करण्याची गरज नव्हती अशा शब्दांत त्यांनी विरोधाचा सूर आळवला. इतरांचं सहन करण्याची गरिमा असते का, असा प्रतीप्रश्न करत विरोधी पक्षनेता आक्रमकच असावा असं म्हणत दानवेंनी पुन्हापुन्हा आपल्या वागण्याचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं.