मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांना आयुक्तपदावरून काढल्यामुळेच त्यांनी माझ्यावर आरोप केले, परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद वाटत होती. वाझे आणि काझी त्यांनाच रिपोर्ट करत होते असं सांगत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत.
चौकशीअंती सत्य समोर येईल असंही त्यांनी सांगितलंय. ईडीच्या छापेसत्रानंतर बोलताना त्यांनी आपल्यावरील कारवाईप्रकरणी परमबीर सिंहांकडे बोट दाखवलंय. चौकशीदरम्यान ईडीला पूर्णपणे सहकार्य केलं आणि यापुढेही करत राहिन असंही अनिल देशमुख यांनी सांगितलंय.
ईडीकडून शुक्रवारी 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूरमधील निवास्थानी धाडी टाकण्यात आल्या. अनिल देशमुख ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानी होते. त्यानंतर दुपारपासून 'सुखदा' इमारतीतील घरातही ईडीकडून चौकशी झाली.
नागपुरमधील घरात मुलगा सलील, पत्नी आरती आणि सून यांचीही 9 तास चौकशी झाली. यावेळी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.