परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे.  

Updated: Dec 2, 2021, 09:54 AM IST
परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी  title=
Pic Courtesy : PTI

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांच्या निलंबनाचा मार्ग मोकळा झाला आहे. परमबीर सिंह यांच्या निलंबनाच्या फाइलवर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आज परमबीर सिंह यांच्या निलंबनाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे. (Permissible action will be taken against Param Bir Singh)

परमबीर सिंह यांच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे त्याचबरोबर सुट्टीचा कालावधी संपला तरीही परमबीर हे कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्या निलंबनासंदर्भात सरकारने कारवाई सुरू केली होती. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे 'फरार' घोषित केल्यानंतर ते मुंबईत परतले. ते खंडणीच्या एका प्रकरणात मुंबई आणि ठाणे पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याआधी सांगितले की, सरकार त्यांच्याविरुद्ध पोलीस सेवा नियमानुसार कारवाई करेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर यांच्या निलंबन फाईलवर सही केली आहे. त्यामुळे परमबीर यांचे निलंबन होणार आहे.

 गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गृह विभागाने अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, 1969 च्या नियम 3 अंतर्गत परमबीर सिंह यांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिला होता. ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे. त्यांची सही होणे बाकी आहे.

परमबीर सिंह ( Param Bir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे.