मुंबई : शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केली. हे काय थोतांड नाहीए, मै तो फकीर हूं, झोली पहने के, असे आमचे कर्मदरीद्री विचार नाहीएत. हे विचार आमचे नाहीत. असा टोला उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
माझ्यावर टीका होतेय, होय हे माझं क्षेत्र नाही, मी पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी आलो आणि या क्षेत्रात ठामपणे पाय रोवून उभा राहिलेलो आहे. ही जबादारी खांद्यावर आहे, ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या एका निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आज सकाळी आरएसएसचा मेळावा झाला, आता शिवेसनेचा मेळावा होतोय, हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय, मला मोहन भागवत यांना सांगायचं आहे की, मोहनजी मला माफ करा, मी जे काय बोलणार आहे, ते मी तुमच्यावर टीका करतोय असं समजू नका, पण तुम्ही जे काही सांगत आहात, आणि मी जे काय सांगतोय, ते जर का आपलीच माणसं ऐकणार नसतील, तर ही मेळाव्याची थेरं करायची तरी कशाला. गेल्या वर्षीही मोहनजी यांनी सांगितली होतं, हिंदूत्व म्हणजे काय, एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो, आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व आहे.
शिवसेना प्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे, तुम्ही सुद्धा त्याला साक्ष आहात, पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो, जात पात धर्म हा नंतर आपल्याला चिकटतो, धर्माचा अभिमान असला पाहिजे, धर्मा पाळायचा, पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपापला धर्म आपल्य घरात ठेवायचा आणि घराबाहेर जेव्हा मी पाऊल टाकतो, तेव्हा हा माझा देश हाच माझा धर्म असलाच पाहिजे.
हे आमचं हिंदूत्व आहे. हा विचार आमचा आहे, ही शिकवण आम्हाला दिली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही घराबाहेर पडतो. आणि देश हा माझा धर्म म्हणून जेव्हा आम्ही वाटचाल करत असतो, त्यावेळेला जर का आमच्या वाटेमध्ये स्वत:च्या धर्माची मस्ती घेऊन कुणी अडथळा आणला, तर मात्र आम्ही कडवट देशाभिमानी, राष्ट्रभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहिल्या शिवाय राहणार नाही, ही सुद्ध आमची पुढची शिकवण आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
सर्व सामान्य माणसाला हेच सांगायचं आहे, की तु सर्वात ताकदवान माणूस आहेस. तुझ्या हातात लोकशाहीने दिलेलं जे शस्त्र आहे, ते म्हणजे मत, आणि हे मत एका क्षणात रावाचा रंक आणि रंकाचा राव करु शकतो, एवढी ताकद तुझ्या मनगटात आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.