दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष सुटका; कोर्टाने काय सांगितलं?

Dutta Samant Murder Case : कामगार नेते आणि माजी खासदार दत्ता सामंत यांच्या 1997 च्या हत्याप्रकरणात  गुंड छोटा राजनला एका विशेष सीबीआय न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष ठरवले आहे. 

आकाश नेटके | Updated: Jul 29, 2023, 09:23 AM IST
दत्ता सामंत हत्या प्रकरणात छोटा राजनची निर्दोष सुटका; कोर्टाने काय सांगितलं? title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Chhota Rajan : कामगार संघटनेचे नेते दत्ता सामंत (Datta Samant killing) यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने (CBI court) निकाल दिला आहे. गँगस्टर छोटा राजनला कोर्टाने क्लीन चीट दिली आहे. सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती ए.एम. पाटील यांनी ठोस पुराव्याअभावी कुख्यात गुंड  छोटा राजनची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. राजन याने सामंत यांची हत्या करण्याचा कट रचला होता हे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही, असे निरीक्षण नोंदवत विशेष न्यायालयाने (SPECIAL CBI Court) छोटा राजनची या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.

राजनने हत्येचा कट रचला हे सिद्ध करणारे काहीही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे आहे. मात्र या प्रकरणात क्लीन चीट मिळाल्यानंतरही राजन तुरुंगातच राहणार आहे. त्याच्यावर अनेक शहरांमध्ये डझनभर खटले सुरू आहेत.

डॉ. दत्ता सामंत हे मुंबईतील कामगारांचे प्रभावी नेते मानले जात होते. त्यांच्या हाकेवर 1982 मध्ये मुंबईतील कापड गिरणी कामगारांनी पूर्ण दोन वर्षे संप केला होता. सामंत यांची 16 जानेवारी 1997 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी ते पवईहून जीपने मुंबईतील पंतनगर भागात असलेल्या त्यांच्या कार्यालयाकडे जात होते. त्यांच्यावर 17 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यावेळी सावंत यांचा ड्रायव्हरही गाडीत होता. सुनावणीदरम्यान त्याचीही चौकशीही करण्यात आली होती. दत्ता सामंत यांच्यावर चार जणांनी गोळीबार केल्याचे त्याने सांगितले होते. चालक जखमी अवस्थेत गाडीतून बाहेर पडला होता. मात्र दत्ता सामंत यांना रुग्णालयात नेले तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणात 2000 मध्ये, दोन शूटर्ससह तीन जणांना हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते. तर राजनचे नाव या प्रकरणात वॉन्टेड आरोपींमध्ये होते. त्यानंतर पोलिसांनी राजनच्या सहभागाचा दावा केला होता आणि आरोप केला होता की आरोपींपैकी एकाचा नातेवाईक त्याला भेटला होता. देशातून पळून गेलेल्या राजनला 2015 मध्ये इंडोनेशियामध्ये अटक करून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेले सर्व खटले सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. ऑगस्ट 2021 मध्ये त्याच्याविरुद्ध खुनाचा खटला सुरू झाला. मात्र आता पुराव्यांअभावी राजनची या प्रकरणातून मुक्तता झाली आहे.

डॉ. सामंत यांच्या चालकासह खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. त्यांनी सीबीआयच्या दाव्याला समर्थन देण्यास नकार दिला. परिणामी, आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी अन्य साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. प्राथमिक तपासादरम्यान मुंबई पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांवर राजन याच्याविरोधातील खटला प्रामुख्याने चालवण्यात आला होता.