Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळण्याची घटना नुकतीच सिंधुदुर्गातील राजकोट येथे घडली आणि या घटनेवर देशभरातून प्रतिक्रिया आल्या. एकिकडे सदर दुर्दैवी घटनेवरून राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं स्पष्ट होत आहे.
सातत्यानं होणारी टीका आणि विरोधकांसह सामान्यांचे संतप्त सूर पाहता आता सत्ताधाऱ्यांनी अर्थात शिंदे सरकारच्या वतीनं काही महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्याच धर्तीवर मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणं शोधत या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी तज्ज्ञ, स्थापत्य अभियंते, आयआयटीसह नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकारांसह इतर तज्ज्ञ मंडळींचा सहभाग असणारी समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी यासंदर्भातील बैठक पार पडली. जिथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी आणि सचिवांची उपस्थिती होती. नौदल अधिकाऱ्यांचीही या बैठकीसाठी उपस्थिती पाहायला मिळाली.
छत्रपतींचा पुतळा नव्याने भव्य स्वरुपात तयार करण्यासह तो उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महारात्ष्ट्रातील नामांकित शिल्पकार यांची भूमिका महत्त्वाी ठरणार असल्याची बाब या बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
दरम्यान, घडलेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. प्रत्यक्षात हा पुतळा सद्भावनेनं उभारण्यात आला होता. पण, भविष्यात मात्र अशी दुर्घटना कधीही घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असं म्हणत भविष्यात उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याबाबत कुठंही कशाचीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.