मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाच्या विकारावरील उपचारांसाठी भुजबळ काल रात्री रुग्णालयात दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीतील महिनाभराच्या धावपळीमुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पोटात दुखू लागल्याचे सांगण्यात येत आहे.
भुजबळ यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे आणखी एक नेते धनंजय मुंडे यांच्या पोटात दुखू लागल्याने रात्री उशिरा त्यांना मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपली प्रकृती ठीक असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं ट्विट केले आहे.
याआधी महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात तुुरुंगात असतानाही छगन भुजबळ यांची प्रकृती दोन ते तीनवेळा बिघडली होती. त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते जामिनावर सुटले, त्यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला. विधानसभा निवडणुकीत ते येवलामधून भुजबळ निवडणूक जिंकले आहेत. आता त्यांना पुन्हा एकदा उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.