चंद्रकांतदादांच्या खात्याचा 'बोगसपणा'

धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलिकडे गेलेल्या मुंबईतल्या मनोरा आमदार निवासाच्या बाबातील एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

Updated: Sep 14, 2017, 05:23 PM IST
चंद्रकांतदादांच्या खात्याचा 'बोगसपणा' title=

मुंबई : धोकादायक ठरलेल्या आणि दुरुस्ती पलिकडे गेलेल्या मुंबईतल्या मनोरा आमदार निवासाच्या बाबातील एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

एकीकडे दोन महिन्यांच्या आत मनोरा आमदार निवास रिकामं केलं जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असं असतानाही मनोरा आमदार निवासातल्या बी विंगमध्ये, बाराव्या मजल्यावर तसंच आणखी काही ठिकाणी चक्क नुतनीकरणाचं काम सुरु असल्याचं दिसून आलं आहे. 

यासाठी नव्या टाईल्स, रेती, सिमेंटची पोती या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. नुतनीकरण कामाच्या निमित्तानं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बिलं चुकती केली जात असल्याची शक्यता यामुळे नाकारता येत नाही. 

आमदार निवास काही दिवसांतच तोडलं जाणार असताना सुद्धा, ही कामं नक्की कोणासाठी केली जात आहेत. तसंच त्याची परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याची मागणी, याच बी विंगमधल्या बाराव्या मजल्यावर राहणार एमआयएमचे आमदार इम्तियाझ जलील यांनी केली आहे.