भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती

चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब...

Updated: Feb 13, 2020, 01:47 PM IST
भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती title=
संग्रहित फोटो

मुंबई : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्ष या पदासाठी पक्षातील अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती. मात्र पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा केली. तर मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्या तात्काळ करण्यात आल्या आहेत. 

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रकांत पाटील यांची पक्षाकडून फेरनिवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाटलांची फेरनियुक्ती जाहीर केलीय. राज्यातील विधानसभा निवडणुकीअगोदर त्यांना जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड करण्यात आलीय.

दरम्यान, महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरेंचं सरकार आपल्याच कर्मानं पडेल असं वक्तव्य करत असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बसलेल्या खुर्चीचा पाय तुटला. मात्र त्यांच्याच बाजुला बसलेले माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी त्यांना धरल्यामुळे चंद्रकांत पाटील पडता पडता वाचले. मात्र सरकार पाडताना चंद्रकांतदादाचं खुर्चीतून खाली पडल्याची खुसखुशीत चर्चा चांगलीच रंगली.

सोलापुरात शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पत्रकार परिषदेत ते फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत, फडणवीस दिल्लीला जाण्याच्या चर्चांबाबत बोलत होते. आणि नेमका त्याच वेळेला खुर्चीचाच पाय तुटला आणि चंद्रकांत पाटलांचा तोल गेला. मात्र वेळीच त्यांना मागून सावरल्यामुळे ते पडता पडता वाचले. मात्र याची चर्चा चांगलीच रंगली.