सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ट्रेन तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

Updated: Jun 17, 2019, 08:31 AM IST
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई: तांत्रिक बिघाड पाचवीला पुजलेली मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. गेल्या आठवड्यात जवळपास सलग सहा दिवस मध्य रेल्वेचा तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा झाला होता. या सगळ्यामुळे प्रवाशांकडून संतापही व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली. 

प्राथमिक माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाकुर्ली या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे ट्रेन तब्बल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. आज पहाटेपासूनच हा गोंधळ सुरु आहे. त्यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. 

दरम्यान, हा बिघाड दुरुस्त होण्यासाठी आणखी किती काळ जाईल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या आठवड्यातही मध्य रेल्वेची वाहतूक अनेकदा विस्कळीत झाली होती. या काळात रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना उद्घोषणा करून याबाबत माहितीही दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवाशांच्या संतापात आणखीनच भर पडली होती. बहुतांश वेळा वाहतूक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले होते. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी अनेक तास लागत असल्याने प्रवाशांना सातत्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.