दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई : उद्या १६ जून रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसचे माजी वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनाही संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. उद्या सकाळी ११ वजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजपाचे आमदार अतुल सावे तसंच मोर्शीचे भाजपाचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांचा समावेश निश्चित असल्याची माहिती मिळतीय. तसंच रिपाईकडून अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आलीय.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा काँग्रेस वरिष्ठांकडे सोपवला आणि तो स्वीकारलाही गेला होता. त्यानंतर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा सोपवून त्यांनी आपला भाजपा प्रवेशाचा मार्ग मोकळा करून घेतला. तेव्हापासूनच मुलगा सुजय विखे याच्या पावलावर पाऊल ठेऊन राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपात सामील होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. इतकंच नाही तर राधाकृष्ण विखेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिक प्रक्रिया बाकी आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं विखेंच्या भाजपमध्ये औपरचारिकरित्या प्रवेश करतील.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाच. शिवाय अहमदनगर मतदार संघात आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभवाचा धक्का देत पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला. त्यापूर्वी, काँग्रेसकडून अहमदनगरमधली जागा सुजय विखे पाटील यांना मिळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भरपूर प्रयत्न केले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडायला नकार दिला. या जागेवर राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली होती. अहमदनगरच्या जागेवरून झालेल्या वादानंतर विखे पाटील आणि पवार घराण्यामधलं जुनं वैरही काढण्यात आलं होतं. अहमदनगरच्या जागेच्या वादानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता.
अधिक वाचा :- भाजपा प्रवेशासोबत राधाकृष्ण विखेंना मंत्रिपद बहाल होणार?