खड्डे शोधून मिळवले तब्बल पाच हजार रुपये

खड्ड्यांनी ४ तासांत मिळवून दिले ५ हजार रुपये

Updated: Nov 19, 2019, 01:52 PM IST
खड्डे शोधून मिळवले तब्बल पाच हजार रुपये title=
संग्रहित फोटो

बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : एका मुंबईकराने खड्डे शोधून काढून तब्बल पाच हजार रुपये मिळवले आहेत. कोण आहे हा मुंबईकर आणि नेमकं काय केलं त्याने? नागरिकांना मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा त्रास, वैताग, मनस्ताप सहन करावा लगातो. पण याच खड्ड्यांनी मुंबईतल्या प्रथमेश चव्हाणला एका फटक्यात ५ हजार मिळवून दिले आहेत. 

खड्डे दाखवा पैसे मिळवा अशी कॅचलाईन असलेल्या  mybmcpotholefixit या महापालिकेच्या अॅपच्या माध्यमातून प्रथमेशने १० खड्ड्यांच्या तक्रारी केल्या आणि त्याला तब्बल ५ हजार रुपये मिळाले. तेही फक्त दादर-माटुंगा परिसरातल्या खड्ड्यांमुळे.

आतापर्यंत mybmcpotholefixit या अॅपच्या माध्यमातून मुंबईकरांच्या सुमारे १७०० पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत. खड्डे २४ तासांत न बुजवल्याने १४७ तक्रारदारांना पाचशे रुपयांप्रमाणे रक्कम देण्यात आली आहे. म्हणजेच खड्ड्यांमुळे अभियंत्यांच्या खिशातून सुमारे पाऊण लाख रुपये गेलेत. 

  

खड्ड्यांनी अवघ्या चार तासांत प्रथमेशला पाच हजार मिळवून दिले. पण त्यामुळे जास्त अधोरेखित झाला तो महापालिकेचा नाकर्तेपणा. अभियंत्यांच्या खिशातून पाऊण लाख गेल्यावर आता तरी खड्डे बुजतील, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे.