Mukesh Ambani, Isha Ambani : व्यवसायात प्रगती करण्यासाठी काही महत्त्वाचे आणि काही अनपेक्षित, कटू निर्णयही घ्यावे लागतात. सध्या अंबानी कुटुंबसुद्धा अशाच निर्णयांच्या साथीनं उद्योग क्षेत्रातील काही मोठे निर्णय घेताना दिसत आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांची मुलगी आणि (Reliance) रिलायन्स रिटेलमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ईशा अंबानीच्या साथीनं एक फायदेशीर निर्णय घेतला आहे.
उपलब्ध माहितीनुसार रियालन्स रिटेलनं (Reliance Retail) त्यांच्या स्टॅटर्जिक रिवॅम्प अर्थात व्यवसायाची पुनर्ररचना करण्याच्या हेतूनं तात्पुरत्या स्वरुपात काही सेंट्रो स्टोअर बंद (Centro stores) करण्याचं ठरवलं आहे. येत्या काळात रिलायन्सच्या इनहाऊस ब्रँडच्या प्रसिद्धीवर कंपनी अधिक भर देताना दिसेल. याशिवाय shop-in-shop model लाही केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असल्याची माहिती प्रतिष्ठीत उद्योग समुहानं प्रसिद्ध केलं आहे.
2022 मध्ये फ्युचर ग्रुपच्या सेंट्रल स्टोअरला सेंट्रो स्टोअर असं नाव दिल्यानंतर हा मोठा निर्णय रिलायन्सनं घेतला आहे. आतापर्यंत या प्रक्रियेअंतर्गत सेंट्रोचे तीन स्टोअर बंद करण्यात आले असून, येत्या काळात आणखी 20 स्टोअर बंद केले जाणार आहेत. या स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांच्या ब्रँडनाही यासंदर्भातील पत्र पाठवत स्टोअर बंद होत असल्याची माहिती देण्यात आली आहे, ज्यामध्ये दुकानांमधून विक्रीसाठीची उत्पादनं, प्रसिद्धीसाठीचं सामान आणि इतर गोष्टी काढण्यास सांगितलं जात आहे.
येत्या काळात कंपनीकडून नव्यानं काही स्टोअरची आखणी केली जाणार असून, त्या माध्यमातून इनहाऊस ब्रँडच्या प्रसिद्धी आणि विक्रीवर अधिक भर दिला जाईल. ज्यामुळं येत्या काळात Azorte, Yousta यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असणाऱ्या Gap आणि Superdry या ब्रँडलाही रिलायन्स प्रकाशझोतात आणताना दिसेल.
सध्याच्या घडीला सेंट्रोकडून 450 स्थानिक आणि जागतिक स्तरावरील ब्रँडच्या उत्पादनांची विक्री केली जात होती. कोरोना काळातही या स्टोअर चेननं चांगलं काम केलं असून, त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढली होती. पण, मागील वर्षापासून मात्र हा आलेख अडखळताना दिसला. ज्यामुळं रिलायन्समध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला. नव्यानं हाती आलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीअखेरीस रिलायन्स रिटेलच्या एकूण उत्पन्नामध्ये 3.5 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. तेव्हा आता नव्या रणनितीतून नफ्याचं ध्येय्य कंपनी गाठणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.